चार चोरट्यांचा व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न फसला; घटना सीसीटीव्हीत कैद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  चार चोरट्यांनी व्यावसायिक संदीप पोपट नागरगोजे (वय 33 रा. आदर्शनगर, नागापूर, नगर) यांच्याकडील पैशांची बॅग पळविण्याचा प्रयत्न केला.

कपाळावर टणक वस्तू मारून डोळ्यात मिरची पुड टाकण्याचाही प्रयत्न झाला. नागापूर परिसरातील आदर्शनगरमधील गुरूकृपा कॉलनीत शनिवारी रात्री ही घटना घडली.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

संदीप नागरगोजे शनिवारी रात्री हे त्यांच्या घराजवळ पार्किंगमध्ये असताना कारमधून आलेल्या चार चोरट्यांनी नागरगोजे यांच्याजवळ असलेली पैशांची बॅग जबरीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

नागरगोजे यांनी प्रतिकार करत प्रसंगावधान राखून पैशांची बॅग घराच्या कंपाउंडमध्ये टाकली. चोरट्यांनी नागरगोजे यांच्या कपाळावर टणक वस्तूने मारून त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकण्याचाही प्रयत्न केला.

त्यावेळी घरातील इतर व्यक्तींही बाहेर आल्याने कारमधूून चोरटे पसार झाले. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नागरगोजे यांच्यावर पाळत ठेवून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

याप्रकरणी नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार चोरट्यांविरूध्द दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहेत.