अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- वडिलांचे सर्वाधिक प्रेम हे आपल्या मुलींमध्ये असते. मात्र चक्क एका निर्दयी बापानेच आपल्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली असल्याचे उघड झाले आहे.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका व्यावसायिकाने स्वतःच्या मुलीचा खून करून तिला करोना झाला होता. त्यात तिचा मृत्यू झाल्याचे भासवून तिच्या मृतदेहाची शेजारच्या गावातील शेतामध्ये विल्हेवाट लावली. संबंधित व्यावसायिकाला आरोग्य विभागातील एका अधिकार्याने मदत केल्याची चर्चा आहे.
याबाबत खुनाचा प्रकार दडपण्यासाठी पैसे उकळणार्यांनी एका वरीष्ठ पोलीस अधिकार्यांच्या नावाचा वापर केल्याचा आरोप करून या खून प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांनी केली आहे.
याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी कि, तिसगाव येथील एका व्यावसायिकाने त्याची 17 वर्षाची मुलीच्या वर्तणुकीवर संशय घेवुन नातेवाईकांच्या मदतीने राहत्या घरातच हत्या करून तिच्या मृतदेहाची दुसर्या गावाच्या हद्दीतील शेतामध्ये रात्रीच विल्हेवाट लावली.
सकाळी गावात येऊन आमच्या मुलीला करोना (कोविड) झाला होता. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यामुळे शासनानेच अंत्यसंस्कार केल्याचे लोकांना भासविले. या कामी त्या व्यवसायिकाला आरोग्य विभागातील एका अधिकार्याने मदत केली.
याची माहिती काही पोलिसांना समजताच त्यांनी सदर व्यावसायिकाकडून लाखो रुपये उकळले. तसेच पैसे उकळण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नावाचा वापर केल्याचे समजते.
यामुळे या प्रकरणाचा तपास करून दोषी व्यक्तीवर कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करावा. अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने बुधवार (दि. 13) रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी मुंडे यांच्या शेवगाव येथील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.