Ahmednagar Crime : रुग्णालयात नोकरी देतो, असे आमिष दाखवून लोणी येथील आरोपीने नाशिक येथील एका विवाहितेला संगमनेर येथे बोलावून, बसस्थानक परिसरात तिचा विनयभंग केल्याची केल्याची घटना बुधवारी (दि. २६) दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथे राहणारी २३ वर्षांची विवाहिता एका नामांकित रुग्णालयात काम करते. तिचा पती खासगी संस्थेत नोकरीला आहे. या विवाहितेची लोणी येथील किरण किसन आहेर (वय ५२) याच्या सोबत व्हाट्सअॅपवर ओळख झाली. या विवाहितेने १५ दिवसांपूर्वी तिच्या नाशिक येथील एका मैत्रिणीला व्हाट्सअॅपवर हाय, असा मेसेज केला होता; मात्र हा मेसेज चुकून आहेर याच्या मोबाईलवर आला. त्यानंतर आहेर याने लगेच व्हाट्सअॅपवर व्हीडीओ कॉल करून या विवाहितेची चौकशी केली.
संगमनरात गुन्हा दाखल
चुकून मेसेज पाठवला, असे सांगून तिने त्याचा फोन कट केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आहेर याने तिला दररोज मेसेज पाठवणे सुरु केल्याने या विवाहितेने आहेर याची चौकशी केली. आपण लोणी येथील रहिवासी असून माझ्या शिर्डीमध्ये शाळा व कॉलेज असल्याचे त्याने सांगितले. तुमच्या कॉलेजमध्ये मला नोकरी भेटेल का, असे तिने आहेर याला विचारल्याने नोकरी भेटेल, असे त्यांनी सांगितले.
संगमनेरमध्येसुद्धा आपले मित्र असून त्यांच्याकडे नोकरी भेटू शकते, असे त्यांनी सांगितले. दि. २५ जुलै रोजी किरण आहेर याने व्हाट्सअॅपवर मॅसेज पाठवून संगमनेरला माझा मित्र डॉक्टर असून त्याच्या रुग्णालयाला नोकरी देतो, तु संगमनेर कागदपत्रे घेऊन ये, असे सांगितले. त्यामुळे नोकरी मिळेल या आशेने सदर विवाहिता बुधवारी दुपारी संगमनेर येथे आली.
या दोघांची भेट बस स्थानकाबाहेर एका हॉटेलमध्ये झाली. यावेळी आहेर याने तिला आपल्या गाडीत बसण्यास सांगितले; मात्र विवाहितेने त्याच्या गाडीत बसण्यास विरोध दर्शवला. तु मला खुप आवडतेस, माझ्यासोबत हॉटेलला चल, असे तो म्हणाला. यावेळी आहेर याने तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्याने आपल्या मोबाईलमध्ये विवाहितेचे फोटो काढले. याचा राग आल्याने या विवाहितेने त्याचा मोबाईल हिसकावुन रस्त्यावर आपटला.
यावेळी तिने त्याच्या गालावर चापट मारून पोलिसांना फोन केला. या दोघांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे जवळच उभे असलेले काही नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी आहेर याला चोप दिला. काही मिनिटांनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. या दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी किरण किसन आहेर याच्या विरुद्ध विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.