Ahmednagar Crime : एकाचे अपहरण करून नंतर त्याला जबर मारहाण करून त्याच्या पाठीवर छातीवर पोटावर वार करून जीवे ठार मारले. या गुन्ह्यात दोषी धरून येथील जिल्हा सत्र न्यायाधीश क्र २ श्रीमती एम. ए. बरालिया यांनी रूपचंद बन्शी बळे (रा. कोळगाव) यास जन्मठेप व ५० हजार रूपये दंड दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद. तर दत्तात्रय लक्ष्मण बळे,
ऋषीकेश विष्णू बळे, अनिल रघुनाथ बळे (सर्व रा. निमगाव मायंबा ता. शिरूर जि. बीड) यांना जन्मठेप व ४० हजार रूपये दंड. दंड न भरल्यास ४ महिने साधी कैद तसेच या चौघांना ७ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १५ हजार रूपये दंड. दंड न भरल्यास ३ महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली.
तसेच यातील आरोपी रूपचंद बन्शी बळे याच्या दंडाच्या रकमेतून ४० हजार तर इतर तिघांच्या दंडाच्या रकमेतून ३० हजार रूपये मृत अमोल सखाराम बळे याच्या आईवडिलांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे. या सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, रूपचंद बन्शी बळे, दत्तात्रय लक्ष्मण बळे, ऋषीकेश विष्णू बळे, अनिल रघुनाथ बळे, मयूर रावसाहब लकारे यांनी सिध्दार्थनगर येथे येवून फिर्यादी भाऊसाहेब बळे याचा चुलत भाऊ मयत अमोल सखाराम बळे याला दत्तात्रय बळे याने फोन करून तु चांगले काम केले व माझी बहिण हिस तु आमच्या स्वाधीन केले त्यासाठी आम्हाला तुला भेटायचे आहे तू बाहेर ये भेटायचे आहे तू बाहेर ये असे म्हणून अमोल यास रूमच्या बाहेर बोलावून घेतले.
अमोल रूमच्या बाहेर आला असता त्याला गाडीत वरील पाचजण एक अनोळखी इसम बसलेला दिसल्याने त्याने गाडीत बसण्यास नकार दिला. तेव्हा रूपचंद याने त्यास बळजबरीने गाडीत बसवून दौंड रोडवरील बळे मासेवाला ढाब्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या त्याच्या घरात नेऊन म्हणाला की, आमची मुलगी तू फूस लावून नगरला बोलावून घेतली.
तेव्हा अमोल त्यास म्हणाला मी नाही बोलावले तीच आली व तिनेच मला फोन करून भेटायचे असे सांगितले. मात्र यावेळी वरील आरोपींनी त्याला लोखंडी रॉड, लाकडी काठ्या, चप्पल बुटांनी बेदम मारहाण केली. नंतर त्याला दिल्ली गेट येथे आणून टाकले. त्याला एका अॅटोचालकाने रूमवर आणून सोडले. त्याला नंतर मित्राने येथील एका रूग्णालयात दाखल केले.
तेव्हा अमोल याने त्याच्या औरंगाबाद येथील त्याचा भाऊ भाऊसाहेब तुकाराम बळे यास याबाबत माहिती दिली. त्यानंतर भाऊ व त्याचे आईवडील नगर येथे आले अमोलची प्रकृती गंभीर असल्याने त्याला औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
भाऊसाहेब तुकाराम बळे याने दिलेल्या फिर्यादीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता अॅड. अनिल डी. ढगे यांनी काम पाहीले. त्यांना सरकारी वकील सतीश पाटील यांनी मार्गदर्शन केले. पैरवी अधिकारी पोलिस हवालदार कृष्णा एन. पारखे यांनी सहकार्य केले.