अहमदनगर क्राईम

जुन्नर परिसरात झालेल्या भीषण अपघातात अकोले तालुक्यातील चार महिला जागीच ठार !

Published by
Ahmednagarlive24 Office

वर्षश्राद्ध विधी आटोपून पुन्हा मुंबईला जाताना पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील पिंपळगावजोगा परिसरात ब्रिझा कार व ट्रॅव्हल्सच्या अपघातात चार महिला जागीच ठार झाल्या असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. चारही मृत महिला अकोले तालुक्यातील आहेत.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, काल रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात भाग्यश्री साहेबराव गायकर (वय १८, रा. कळंब, ता. अकोले, जि. अ. नगर) व कुसूम मारुती शिंगोटे (वय ५५, ता. बदगी बेलापूर, ता. अकोले, जि. अ. नगर), सविता साहेबराव गायकर (सर्व रा. कळंब) व सुनिता कारभारी हाडवळे (रा. लिंगदेव, ता. अकोले, जि. अ. नगर) अशा चौघी मयत झाल्या आहेत.

तर वाहन चालक साहिल साहेबराव गायकर, साहेबराव रामदास गायकर, असे दोघे जखमी असून त्यांच्यावर आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गायकर परिवार हा मुळचा ब्राम्हणवाडा- कळंब येथील आहे. गायकर हे मुंबईत क्लासेस घेत असून ते मुंबईत स्थायीक झाले आहेत; मात्र त्यांच्या नात्यातील जवळचे व्यक्ती मयत झाल्याने ते गावाकडे ब्राम्हणवाडा येथे आले होते. काल, वर्षश्राद्ध विधी अटोपल्यानंतर रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी त्यांच्या एमएच ४३ सीजी २९१३ या ब्रिझा कारमधून सकाळीच मुंबईला निघाले होते.

सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास ते पिंपळगाव जोगा परिसरात असताना त्यांच्या समोरून कल्याणकडून नगरच्या दिशेने एमएच ४७ बीएल ४२५१ ही टेम्पो ट्रॅव्हल्स बस आली. पाऊसदेखील चालु होता. त्यात रस्ता पूर्ण ओला झालेला होता आणि चिखलदेखील होता. त्यामुळे, टेम्पो ट्रॅव्हल्स चालकाला वेगावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे दोन्ही गाड्या एकमेकांना अगदी समोरासमोर धडकल्या आणि रस्त्याच्या खाली फेकल्या गेल्या.

ट्रॅव्हल मोठी असल्यामळे त्यातील पाच लोक जखमी झाले. मात्र आर्थिक नुकसान सोडता कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी झाली नाही. अचानक झालेल्या अपघातामुळे बसमधील प्रवाशांनी एकच आरडाओरडा केला. महिलादेखील घाबरून गेल्या होत्या.

त्यातील लहान मोठ्या प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या तर चालक धनंजय सोपान दास (वय २६, रा. गोरेगाव, मुंबई) आणि क्लिनर ससोदर सुमीदर दास (वय ४०, रा. गोरेगाव) या दोघांनाही इजा झाली.

कारचे चालक साहील आणि साहेबराव चासकर कारमध्ये पुढे बसलेले होते. गाडीची एअरबॅग उघडल्यामुळे कदाचित दोघांना काही झाले नाही; मात्र मागे बसलेली साहिलची बहिन भाग्यश्री साहेबराव गायकर, एक नातेवाईक कुसूम शिंगोटे, सविता गायकर आणि सुनिता हाडवळे यांना जबरी मार लागला.

यात त्या मरण पावल्या. काही वेळात त्यांना गाडीतून बाहेर काढण्यात आले. जखमींना तात्काळ एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. जखमींची प्रकृती चांगली असल्याची माहिती पोलीस ठाण्याकडून मिळाली.

Ahmednagarlive24 Office