Ahmednagar Crime : बनावट सोने देऊन आठ लाखांची फसवणूक ! तिघांविरोधात गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Crime : जामखेड शहरातील एका कापड व्यावसायिकाची बनावट सोने देत आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला गणेश महादेव खेत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी खेत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे जामखेड शहरात भाजप पक्ष कार्यालयाशेजारी कापड दुकान आहे. कापड दुकानामध्ये सुमारे एक महिन्यापूर्वी दोन अनोळखी इसम व एक अनोळखी महिला कपडे खरेदी करणासाठी आले होते व त्यांनी काही कपडे खरेदी केले होते. त्यानंतर सुमारे १५ दिवसांपूर्वी सदर इसम हे पुन्हा माझे दुकानात आले.

त्यापैकी एका इसमाचे त्याचे नाव प्रजापती असे असल्याचे सांगितले होते. त्यावेळी ते तिघेही आम्हाला म्हणाले की, आमचेकडे जुन्या सोन्याच्या वस्तु आहेत. त्या तुम्ही तुम्ही चेक करुन पहा असे म्हणुन त्यांनी मला सोन्याचे मणी असलेला

एक माळांचा गुच्छ दाखविला व त्यातील दोन मणी तोडुन त्यांनी मला देवुन हे चेक करुन पहा असे म्हणाले व निघुन गेले. त्यानंतर मी सदर मणी जामखेड शहरातील एका सोनाराच्या दुकानात घेवुन गेलो असता त्यांनी ते खरे सोने असल्याचे सांगितले.

सदर इसमापैकी प्रजापती हा मला नेहमी फोन करत असे व आमचेकडे अजुन जुन्या सोन्याच्या वस्तु असुन त्या तुम्ही १० लाख रूपयांत विकत घ्या असे म्हणत असे. त्यावेळी मी त्यांना ८ लाख रुपये देईल असे सांगितले होते.

सदर रक्कमेला त्यांच्याकडील वस्तु देण्यास तयार झाले होते. त्यानुसार दि.२० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास प्रजापती (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) व त्याचेसोबत मला पुर्वी प्रजापती सोबत भेटलेले एक इसम व एक महिला माझे दुकानामध्ये आले व मला म्हणाले की,

आम्ही आमचेकडे असलेल्या जुन्या सोन्याच्या वस्तु घेवुन आलो आहेत. तुम्ही आम्हांला आठ लाख रुपये द्या, आम्ही तुम्हांला आमचेकडील सोन्याच्या वस्तु देतो. असे म्हणाल्याने मी माझ्याकडे असलेली आठ लाख रुपयांची रोख रक्कम अनोळखी बाईकडे दिली.

त्यावेळी प्रजापती व त्याचेसोबत असलेल्या त्या अनोळखी इसमाने त्यांच्याकडे असलेले जांभळ्या रंगाचे पिशवीमधील काळे रंगाचे प्लास्टिक पिशवीमधील सोन्याचे मणी असलेला माळ्याचा गुच्छ मला दिला व तेथुन निघुन गेले.

त्यानंतर दि. २४ जानेवारीला मी सदरचा सोन्याचे मणी असलेला माळेचा गुच्छ घेवुन सोनाराच्या दुकानात चेक केला असता सदर सोने बनावट असल्याचे सांगितले, तेव्हा मला धक्का बसला.

मी प्रजापती याच्या नंबरवर फोन केला असता सदर नंबर बंद लागत असल्याने माझी फसवणुक झाल्याचे माझ्या लक्षत आले. त्यानंतर याबाबत जामखेड पोलीस स्टेशनला तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. संतोष कोपनर करत आहेत.

सध्या घरात बसून ऑनलाईन फसवणूक तसेच खोटे अमिष दाखवून फसवणूक केली जात आहे. याबाबत नागरिकांनी सावध राहावे विना नंबर व्हिडिओ कॉल घेऊ नयेत, तसेच तुमचा नंबर लकी आहे. तुम्हाला एवढे बक्षीस लागले आहे.

तसेच काही लिंक पाठवतात हे सर्व फसवे आहे. कोणीही अशा लिंक ओपन करू नये. ज्यांना कोणाला असे फोन येतील तर ताबडतोब पोलिसांना कळवा पोलीस कारवाई करतील. – पोलीस निरीक्षक महेश पाटील