दरोड्याच्या तयारीत असलेल्या मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह त्याचे ४ साथीदारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. कोपरगाव तालुक्यातील देर्डे- कोऱ्हाळे शिवार परिसरात दरोड्याच्या तयारीत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 10 लाख 83 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
मयूर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड (वय 21, रा.इंदिरानगर, ता.कोपरगाव), अमोल उर्फ ऋतुंजय अविनाश कुंदे (वय 20, रा.एकरुखे, ता.राहाता), समाधान देविदास राठोड (वय 23, रा.करंजीबोलकी, ता.कोपरगाव), संदीप पुंजा बनकर (वय 33, रा.द्वारकानगर रोड, शिर्डी), उमेश तानाजी वायदंडे (वय 27, रा.गणेशनगर, ता.राहाता) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश भिकुनाथ तेलोरे (रा. गणेशनगर, ता.राहाता), राहुल शिवाजी शिदोरे (रा.गोकुळनगर, ता.कोपरगाव) हे फरार झाले आहेत.
अधिक माहिती अशी : जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील गंभीर स्वरुपाचे गुन्हे उघड करण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार त्यांनी सपोनि हेमंत थोरात यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार बाळासाहेब मुळीक, रविंद्र कर्डीले, दत्तात्रय गव्हाणे आदींचे पथक तयार करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचित केले.
यानुसार कारवाई करत असताना सपोनि हेमंत थोरात यांना 15 फेब्रुवारीला गुप्त माहिती मिळाली की, मयूर उर्फ भुऱ्या गायकवाड त्याच्या काही साथीदारासह 2 कारमध्ये येऊन देर्डे-कोऱ्हाळे शिवारात दरोडा घालण्याचे तयारीत आहे. थोरात यांनी प्राप्त माहिती पथकास दिली. पथक तातडीने त्या ठिकाणी रवाना झाले.
या ठिकाणी काही इसम अंधारामध्ये दिसून आले. पाठलाग करत पोलिसांनी वरील आरोपीना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 तलवार, 1 कटावणी, 1 कत्ती, 1 लाकडी दांडके, मिरचीपुड, 1 ऍ़पल व 3 विविध कंपनीचे मोबाईल फोन, 1 इर्टीगा व 1 वोल्क्सवॅगन कार असा 10 लाख 83 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.