अहमदनगर क्राईम

प्रतीक काळे प्रकरणाची निष्पक्ष चौकशीसाठी गडाखांना मंत्रिपदावरून दूर करावे

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून प्रतीक काळे आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजू लागले आहे. तसेच या प्रकरणामुळे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे.

प्रतीक काळे या युवकाने जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर आरोप करणारा व्हिडिओ जाहीर करून आत्महत्या केल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी त्यांना मंत्रिपदावरून दूर करावे, अशी मागणी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

गडाख यांच्यासह अनेकांची नावे घेऊन प्रतीक काळे याने मृत्यूपूर्वी तयार केलेला व्हिडिओ मृत्यूपूर्व जबानी असल्याने त्या दिशेने तपास होणे गरजेचे असून गडाख सत्तेवर असल्याने तपासावर दबाव येऊ शकतो, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना पदावरून दूर करावे, असे उपाध्ये म्हणाले.

‘या’ प्रकरणावर गडाखांचे स्पष्टीकरण प्रतीक काळे आत्महत्येप्रकरणी भाजपकडून होणारे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे मंत्री शंकरराव गडाख यांनी म्हटले आहे. या आरोपांचे खंडन करून ते म्हणाले, काळे याची आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे. मात्र प्रतीक माझा पीए होता किंवा मी दबाव आणला, हे आरोप निखालस खोटे आहेत.

आमचे फोनवरही बोलणे झालेले नाही. एफआयआरमध्ये सर्व गोष्टी नमूद आहेत. पोलिसांकडून तपास सुरू आहे. उलट कोणत्याही दबावाला बळी न पडता या घटनेचा सखोल तपास व्हावा, अशी माझी मागणी आहे.

Ahmednagarlive24 Office