अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व श्रीरामपुर पोलिस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर, नेवासा, शिर्डी, शेवगाव तालुक्यात रात्री दरोडे टाकून लूटमार करणाऱ्या टोळीला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे २३ सप्टेंबर रोजी विराज खंडागळे यांच्या घरावर रात्री दरोडेखोरांनी हल्ला करत लूटमार केली होती.
त्यामध्ये एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. दरम्यान सदर दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व श्रीरामपूर पोलिसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार संबधित आरोपींच्या अड्ड्यावर छापा टाकत ६ जणांच्या टोळीला अटक केली आहे.
दरम्यान या टोळीकडून तब्बल २७ लाख रुपयाचे ४८३ ग्रँम वजनाचे सोन्याचे दागिने व १०० ग्रँम वजनाचे चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केली आहे.
विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या ६ आरोपींवर तब्बल ४४ गुन्हे दाखल असुन यांच्याकडून आणखीन गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.