Ahmednagar Crime : झाडपाल्याचे औषध देतो, या नावाखाली एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी आदिवासी ठाकर बांधवांचा मोर्चा आज सोमवारी राजूर पोलीस स्टेशनला धडकणार आहे.
याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या अभयारण्यातील उडदावणे या गावामध्ये झाडपाल्याचे औषध देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीने जंगलामध्ये तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता.
दि. ६ ऑक्टोबर रोजी राजुर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली होती. फिर्याद दाखल होताच आरोपी फरार झाला होता. हा फरार आरोपी आजपर्यंत राजुर पोलिसांच्या हाती लागला नाही.
या आरोपीला तात्काळ अटक करावी, यासाठी भंडारदऱ्याच्या अभयारण्यातील आदिवासी ठाकर समाजाने आवाज उठविला असून गुरुवार दि. २६ ऑक्टोबर रोजीच पोलिस स्टेशनला घेराव घालण्याचे निश्चित केले होते;
परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याच दिवशी निळवंडे धरणाच्या लोकार्पणाचा सोहळा असल्यामुळे हे नियोजित आंदोलन सोमवारी करण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला होता.
हे आंदोलन राजुर बसस्थानकापासुन निघणार असुन ते राजुर पोलिस स्टेशनला धडकेल. आंदोलनामध्ये आदिवासी ठाकर समाजाचे मारुती मेंगाळ, देविदास खडके, लक्ष्मण पोकळे, सखाराम गांगड, अर्जुन खोडके, पांडुरंग उघडे, मिनानाथ उघडे व परिसरातील ठाकर समाजाचे कार्यकर्ते सामील होणार आहेत.