Ahmednagar Crime : चोरीच्या सोयाबीनसह ९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : सावळीविहीर खुर्द (ता. राहाता) येथील संतोष भदे त्यांच्या घरासमोरून २४ किंटल सोयाबीनच्या गोण्या २० जानेवारी पहाटे चोरून नेणाऱ्या आरोपींना अटक करून ९ लाख २९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत संतोष भास्कर भदे यांनी शिर्डी पोलिसात फिर्याद दिली होती. शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपास सुरू होताच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, विजय पवार, अण्णासाहेब दातीर, बाबासाहेब खेडकर, सोमेश गरदास यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला.

दरम्यान, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा अमोल वाल्मिक दंडवते, अमोल रामदास आहेर (दोन्ही रा. तीनचारी, कोकमठाण, ता. कोपरगाव), शुभम रमेश भालेराव (रा. कोपरगाव) यांनी केलेला असून सदरचा चोरीस गेलेला माल श्रीकांत विलास चौरे (रा. खडकी, ता. कोपरगाव) याच्या टाटा आईस टेम्पो मध्ये भरून कोपरगावकडून येवल्याकडे घेऊन जाणार आहे,

अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानेपोलिसांनी कोपरगाव ते येवला जाणारे रोड वर श्रीदत्त मंदिरासमोर सापळा रचुन श्रीकांत विलास चौरे (रा. खडकी, ता. कोपरगाव) याला पकडले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, अमोल वाल्मिक दंडवते, अमोल रामदास आहेर (दोन्ही रा. तीनचारी कोकमठाण, ता. कोपरगाव), शुभम रमेश भालेराव (रा. कोपरगाव) यांची सोयाबीन विक्रीसाठी घेऊन चाललो आहे.

दरम्यान, पाठीमागुन येणारी इर्टिगा कार थांबवुन त्यामधील इसमास त्यांचे नाव गाव विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव अमोल वाल्मिक दंडवते, अमोल रामदास आहेर, असे असल्याचे सांगितले.

त्यावेळी शुभम रमेश भालेराव हा तेथुन पळुन गेला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदर सोयाबीन चोरीचा गुन्हा कबुल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

यावेळी ९ लाख २९ हजाराचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीना राहाता न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या पथकाने केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe