Ahmednagar Crime : विकासकामासाठी आयोजित ग्रामसभा मुद्यावरून थेट गुद्यावर ! दोन्ही बाजूंनी एकमेकांना दिली जीवे मारण्याची धमकी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Crime : ग्रामपंचायत ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

गावातील नागरिकाना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या अडचणी देखील सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात.

यासाठी दर महिन्याला ग्रामस्थ , ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामसभेचे आयोजन केले जाते. दरम्यान ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विकासकामाबाबत चर्चा होत असताना दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे . याबाबत दोन्ही गटाकडून एकमेंकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी, गावात झालेल्या विकासकामाबाबत श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विकासकामांबाबत चर्चा सुरू असताना गावातील एका गटाने झालेल्या कामांबाबत आक्षेप घेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

यावेळी दुसऱ्या गटातील काही जणांनी त्यांना समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामसभेत गोंधळ निर्माण होऊन दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत तुंबळ हाणामारी सुरू होऊन प्रकरण एकमेकांना जिवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत गेले.

त्यामुळे विकासकामांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत चर्चा तर झालीच नाही पण पोलिस ठाण्याची वारी झाली, अशी चर्चा या गावात सुरू आहे.