अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- घरफोडीचे तब्बल ९ गुन्हे दाखल व पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीसस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. सचिन विजय काळे (रा. पाथर्डी रोड, शेवगाव, असे आरोपीचे नाव आहे.
पाच महिन्यांपूर्वी चोरी करून काळे हा फरार झाला होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर शहरात त्याला शिताफीने पकडले. त्याने तालुक्यातील मजलेशहर व हातगाव येथे चोरी केली होती.
त्याच्यावर शेवगाव येथे पाच, नगर येथे तीन तर गंगापूर असे नऊ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील ज्ञानेश्वर लोढे यांच्या घरात प्रवेश करून सुमारे एक लाख ५९ हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली होती.
तसेच हातगाव येथील शोभाबाई झंज यांच्या घरात प्रवेश करून घरातील लोकांना मारहाण करून दोन लाख ४२ हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली होती.
याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात लोढे व झंज यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासात सचिन विजय काळे याचे नाव निष्पन्न झाला होता मात्र तो फरार झाला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना आरोपी काळे हा अहमदनगर शहरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.
त्यानुसार गुरुवारी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहेकाँ. मन्सूर सय्यद, पोना. शंकर चौधरी, बर्डे, कमलेश पाथरूट, आकाश काळे आदींच्या पथकाने त्यास शिताफीने पकडले.