Ahilyanagar News:- काल संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द बाजारतळ या ठिकाणी सुजय विखे यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केलेले होते. या सभेमध्ये ज्येष्ठ काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री थोरात यांच्या बद्दल जे काही आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले त्यानंतर मात्र संगमनेर मध्ये वातावरण खूप तापदायक झाले
व या ठिकाणी महिला एकत्र येत महिलांनी सभा उधळून लावली व इतकेच नाही तर सुजय विखे यांच्या ताफ्यातील काही गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ देखील करण्यात आली.
या सगळ्या प्रकरणामुळे आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये मात्र नगर जिल्ह्याचे वातावरण तापले असून संगमनेर तालुक्यामध्ये जनतेने एकत्र येत सुजय विखे यांना संगमनेर तालुका बंदी करण्याचा ठराव एकमताने मंजूर केलेला आहे.
सुजय विखे पाटील यांच्या या युवा संकल्प मेळावा मध्ये भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसकडून या ठिकाणी रात्रभर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र सुजय विखे यांना आता काँग्रेस कडून मोठ्या प्रमाणावर टार्गेट करण्यात येत आहे व या सगळ्या प्रकरणाचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून देखील संताप व्यक्त केला जात आहे. परंतु या सगळ्या प्रकरणावर मात्र आता सुजय विखे यांच्या मातोश्री शालिनीताई विखे पाटील यांची कडक शब्दांमध्ये प्रतिक्रिया समोर आली असून त्या आज नगरमध्ये बोलत होते.
काय म्हणाल्या शालिनीताई विखे पाटील?
या सगळ्या प्रकरणावर बोलताना शालिनीताई विखे यांनी म्हटले की “ ते जर खालच्या पातळीवर बोलत असतील तर सुजय विखे मेलेल्या आईचे दूध प्यायला नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल. आपण कुणीही बांगड्या भरलेल्या नाहीत. खालच्या पातळीवर आपण कोणीही जाता कामा नये.
तसेच पुढे बोलताना त्यांनी म्हटले की वसंतराव देशमुख यांनी जे काही चुकीचे शब्द वापरले त्या शब्दाचा सर्व शिर्डी मतदारसंघाच्या माध्यमातून सुजय विखे यांनी निषेध केलेला आहे.
परंतु यापुढे जर कोणी लोणी गाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही देखील त्यांना सोडणार नाहीत असा स्पष्ट इशाराच शालिनीताई विखे पाटील यांनी बोलताना दिला. तसेच विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, काही लोकांना चांगलं काम बघवलं जात नाही व त्यामुळे काही मंडळी चांगल्या कामांमध्ये विघ्न आणण्याचे काम करतात.
वसंतराव देशमुख यांच्या चुकीच्या वक्तव्याचा आपण निषेध केलेला आहेच. खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी जे भाषण केलेले आहे ते सुद्धा आमच्याकडे रेकॉर्ड आहे. सहनशीलतेला सुद्धा काहीतरी अंत असतो.
एक आई म्हणून मी सुजयचे सर्व भाषण ऐकत असते. आपल्या मुलाच्या तोंडून एकही वाक्य चुकीचे जाऊ नये असे संस्कार आम्ही त्याला दिलेले आहेत. असे देखील शालिनीताई यांनी म्हटले.