अहमदनगर शहरात बुरखाधारी महिलांनी ३ लाखांचे हिरे, सोन्याचे दागिने लांबविले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : नगर सावेडीतील कोहिनूर मॉलमधील कल्याण ज्वेलर्स येथून दोन बुरखाधारी महिलांनी दोन लाखांचे चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने व एक लाख रुपये किमतीचे हिऱ्याचे दागिने, असे तीन लाख रुपयांचे दागिने लंपास केले.

याच महिलांनी आधी शिंगवी ज्वेलर्स येथेही चोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सेल्समन पूजा शाम जगताप यांनी मंगळवारी रात्री उशिरा तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री सव्वा आठ वाजता दोन बुरखाधारी महिला दागिने पाहण्यासाठी दुकानात आल्या होत्या. त्यांनी सोने खरेदी करायचे असल्याचे सांगून नेकलेसची मागणी केली. यावेळी सेल्समन पूजा जगताप या त्यांना दागिने दाखवत होत्या. जगताप यांची नजर चुकवून त्या दोन महिलांनी तीन लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन पोबारा केला.

रिक्षातून आल्या होत्या

महिला बुरखाधारी महिला या रिक्षातून दुकानात आल्या होत्या. दुकानात चोरी केल्यानंतर त्याच रिक्षातून त्या पसार झाल्याचे समोर आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती रिक्षाही दिसून आली.

मात्र, त्यावरील क्रमांक दिसत नाही. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी शहरातील दोन-तीन दुकानांमध्ये अशाच पद्धतीने चोरी झाली होती. त्यामुळे ऐन दिवाळीच्या धामधुमीत बुरखा घालून चोरी करणाऱ्या महिलांची टोळी पुन्हा शहरात कार्यरत झाल्याचे चित्र आहे.