अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- आज कोरोनामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली असताना दुसरीकडे सावकार त्यांना अजून लुटत असल्याचे गंभीर प्रकार जामखेड तालुक्यात घडत आहेत.
या ठिकाणी एकाच आठवड्यात अशा प्रकारच्या तीन सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, जामखेड तालुक्यातील बांधखडक येथील झाडू तयार करणारा सुनील लक्ष्मण अडागळे (वय ३४) याने खाजगी सावकार सोमीनाथ बाजीराव वनवे व सोपान बाजीराव वनवे यांनी २०,००० रुपये ५ टक्के व्याजाने दिले होते.
त्या पैश्याच्या व्याजापोटी अडागळे याने त्यास ५०,००० रुपये दिले होते. मात्र सावकाराने पुन्हा अडागळे याच्याकडे १५ हजार रुपये राहिले आहेत.असे म्हणून पैशाचा तगादा लावला व घरासमोर बांधलेल्या २ शेळ्या वनवे याने बळजबरीने घेऊन गेला.
फिर्यादीची पत्नी सदरच्या शेळ्या आणण्यासाठी या सावकाराकडे गेली असता. सोपान बाजीराव वनवे म्हणाला की, माझे पैसे आत्ताच्या आत्ता दे व तुझ्या शेळ्या घेऊन जा. असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली.
तेव्हा सुनील अडागळे तेथे गेला व पत्नीला घरी घेऊन आला मात्र त्यानंतर सोमीनाथ वनवे हा अडागळे याच्या घरासमोर येऊन म्हणाला की, मी गावात लोकांना साखर वाटली आहे माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही.
असे म्हणून कुटुंबियांना शिवीगाळ केली. यावरून सुनील लक्ष्मण अडागळे याने दिलेल्या फिर्यादीवरून सोमीनाथ बाजीराव वनवे. सोपान बाजीराव वनवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.