Ahmednagar Crime : कुकाणे जुन्या वादातून रस्त्यात अडवून दोघांना कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी नेवासे पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी (१८ फेब्रुवारी) दुपारी पाचेगाव फाटा रस्त्यावर शिवाजीराव कॉलेज ऑफ फार्मसी कमानीजवळ ही घटना घडली.
‘
त्यात दोघे जखमी झाले आहेत. शंभू कोळेकर, सारंग कोळेकर (दोन्ही रा. मुकिंदपूर, ता. नेवासे) व ज्ञानेश्वर दहिफळे (रा. दैत्यनांदूर, ता. पाथर्डी) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत महेश अभय तेलतुंबडे (वय २२, रा. मुठेवडगाव, ता. श्रीरामपूर) यांनी नेवासे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, की तेलतुंबडे हे आपले मित्र विशाल तुवर, अभिषेक राऊत, शुभम कवडे, अभिजित उंडे, कुणाल मकोने, युवराज पवार, प्रथमेश बनसोडे यांच्यासोबत पाचेगाव फाटा रस्त्याने दुचाकीवर जात होते.
अभिजित उंडे व सारंग कोळेकर यांच्यात जूना वाद असून, त्यातूनच आरोपी शुभम कोळेकर, सारंग कोळेकर, ज्ञानेश्वर दहिफाळे व इतर दोन अनोळखींनी रस्त्यात अडवले. फिर्यादी महेश तेलतुंबडे याच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केला. मात्र, फिर्यादीने उजवा हात आडवा केल्याने, हाताला दुखापत झाली.
तसेच फिर्यादीचा मित्र प्रथमेश बनसोडे याच्या डोक्यात, मानेवर, हातावर कोयत्याने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत नेवासे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भोंबे तपास करीत आहेत.