लग्नामध्ये फसवणूक करून लुटणाऱ्या महिला, टोळ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. अहमदनगरमधून या आधीही फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत. आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. लग्नासाठी मुलीचा शोध घेत असणाऱ्या ३५ वर्षे वयाच्या लग्नाळू तरूणाचा शोध घेवून एका महिलेने मध्यस्थी करत लग्न लावून दिले.
मात्र, लग्नानंतर सुमारे सव्वादोन लाखांचे दागिने व रोकड घेवून ही मध्यस्थ महिला आपल्या साथीदारासह फरार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. किशोर गंगाधर हाडके (वय-३५, रा. माळेवाडी, ता. श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, आपण माळेवाडीला आई, वडील, भाऊ, भावजई यांच्याबरोबर राहातो.
शेती व पेंटींग काम करून उदरनिर्वाह करतो. माझे आई, वडील माझ्या लग्नासाठी मुलीचा शोध घेत होते. तेव्हा जातेगाव, ता. वैजापूर येथील नातेवाईकाने वडीलांना सांगितले की एक स्थळ आहे.
तेव्हा आपण व भाऊ, काका व मावसभाऊ असे नातेवाईक त्यांच्या ओळखीच्या सुमनबाई यांना सोबत घेवून मुलगी पाहण्यासाठी गेलो. त्यावेळी आम्हाला मुलगी दाखवण्यात आली. मुलगी पसंत झाल्याने मध्यस्थी सुमन मावशी हिने लग्न जमवण्यासाठी १ लाख ७० हजारांची मागणी केली.
त्यावेळी आम्ही तिला लग्नाच्या दिवशी ५० हजार रूपये रोख स्वरूपात व ५० हजार रूपये फोन पे वरून असे १ लाख रूपये दिले. त्यानंतर लग्न प्रवरासंगम येथे महादेव मंदिरात हिंदू पद्धतीने धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे झाले. लग्नात मुलीच्या अंगावर १ तोळा वजनाचे सोन्याचे कानातील फूल व मनीमंगळसूत्र असे दागिने घातले होते.
लग्न झाल्यानंतर मुलीला घेवून गावी माळेवाडी येथे आलो. दुसऱ्या दिवशी सुमनबाई हिला पुन्हा ७० हजार रूपये रोख स्वरूपात दिले. असे एकूण २ लाख २५ हजार रूपये त्यात १ लाख २० हजार रूपये रोख, ५० सोन्याचे कानातील व मंगळसूत्र त्यांना दिले.
मात्र, वरील वर्णनाची रोकड व सोन्याचे दागिने घेवून आरोपी हे संगनमत करून फरार झाले असे किशोर हाडके यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. हाडके यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलिसांनी सुमनबाई (पूर्ण नाव माहीत नाही), शारदा गणेश शिरसाठ, लताबाई चव्हाण (पुर्ण नाव माहीत नाही), पत्नी पिंकी अशोक ढवळे यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३४, ४०६, ४२० प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.