Ahmednagar Crime : व्याजाच्या वसुलीसाठी सावकाराचा भलताच उद्योग ! तरुण शेतकऱ्याला विषारी औषध पाजून…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Crime : व्याजाची रक्कम वसूलीसाठी सावकाराने एका तरुण शेतकऱ्याला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरी शहरात काही खाजगी सावकारांनी व्याजाची रक्कम वसुल करण्यासाठी एका तरूण शेतकऱ्याला विषारी औषध पाजून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.

राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील प्रसाद ज्ञानदेव तोडमल (वय ३५) हा तरूण शेतकरी शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. राहुरी शिवारात बारागाव नांदुर रोडला त्याची दोन एकर शेती आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रसाद तोडमल याने घरगूती कामासाठी खंडाबे येथील यशवंत गोकुळ दुधाडे याच्याकडुन ५ लाख रुपये कर्ज व्याजाने घेतले होते. तारण म्हणून २० गुंठे शेतीचे खरेदीखत यशवंत गोकुळ दुधाडे याला करून दिले होते.

त्यानंतर प्रसाद तोडमल याने नियमितपणे सहा महिने ५ लाख रुपये रकमेचे व्याज दिले. नंतर सावकाराने व्याजदरात वाढ केली. प्रसाद तोडमल याने पुन्हा २० गुंठे शेत जमीनीचे खरेदीखत यशवंत दुधाडे याच्या नावे करून दिले.

असे करुन ६० गुंठे शेती यशवंत दुधाडे याच्या नावे करून दिली. त्यानंतर प्रसाद तोडमल याने सोमनाथ भाऊसाहेब घाडगे याला २६ गुंठे शेत जमीनीचे खरेदीखत देवुन त्याच्याकडून ५ लाख रूपये व्याजाने घेतले आणि यशवंत दुधाडे याचे पैसे फेडले.

अशा प्रकारे प्रसाद तोडमल याने आता पर्यंत यशवंत दुधाडे याला सुमारे ८ लाख रुपये व सोमनाथ घाडगे याला ७ लाख रुपये परत दिले. त्यानंतर ठरल्या प्रमाणे शेतीचे खरेदीखत मला परत द्या, असे प्रसाद तोडमल याने सावकारांना सांगितले.

मात्र सावकारांनी प्रसाद तोडमल याची शेत जमीन परत करण्यास टाळाटाळ केली. (दि.१८) ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रसाद तोडमल हा तरूण बारागाव नांदुर रोडला त्याच्या शेतात असताना आरोपी सावकार तेथे गेले.

त्यांनी प्रसाद तोडमल याचे हात पाय धरुन त्याला विषारी औषध पाजून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रुग्णालयात उपचार घेतल्या नंतर प्रसाद ज्ञानदेव तोडमल याने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार आरोपी सावकार यशवंत गोकुळ दुधाडे (रा. खडांबे खुर्द), सोमनाथ भाऊसाहेब घाडगे (रा. राहुरी खुर्द), शुभम यशवंत दुधाडे (रा. राहुरी खुर्द), ललित घाडगे (रा. राहुरी खुर्द, ता. राहुरी) या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.