Shirdi News : लग्नाला विरोध केल्याने प्रियकराकडून विवाहित प्रियसीचा खून ! स्वतः शिर्डी पोलीस ठाण्यात हजर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shirdi News : प्रियकराच्या लग्नाला विरोध केला म्हणून प्रियकराने विवाहित प्रियसीचा धारदार चाकूने वार करत खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. १६ जुलै) सकाळी पावनेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

खून केल्यानंतर हा तरूण स्वतः शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाला. सविता सुनिल बत्तीशे (रा. सावळीविहीर) असे मयत महिलेचे तर अजय राजेंद्र म्हस्के असे आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले, की सविता या महिलेचा विवाह नाशिक जिल्ह्यातील एकलहरे येथे सुनील माणिक बत्तिशे यांच्या सोबत झाला होता.

सविताला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सविताच्या घराजवळ सावळीविहीर येथे मामाकडे अजय राजेंद्र म्हस्के याचे येणे जाणे होते. यातून त्याची सवितासोबत ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.

काही काळानंतर सविता मुलांना व पतीला सोडून अजयसोबत रुईजवळ भोपळे वस्ती येथे एकत्रित राहू लागली; मात्र अजय याला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचे होते. याला सविता विरोध करीत होती. त्यामुळे तो सतत सविताला मारहाण व शिवीगाळ करत होता.

याबाबत सविताने शिर्डी पोलिस स्टेशनला तक्रारदेखील नोंदवली होती. या पार्श्वभूमिवर सविता व अजय यांचे रविवारी पुन्हा भांडण झाले. यातून अजय याने धारदार चाकूने सविताचा भोसकून खून केला. यानंतर आरोपी अजय स्वतः शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाला.

माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. यानंतर मृतदेह साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केला असता ती जागेवर मयत झाल्याचे निष्पन्न झाले. आरोपी अजय म्हस्के यास अटक करण्यात आली असून कडू किसन आव्हाड (वय ४५, रा. शिर्डी) यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी अजय राजेंद्र म्हस्के याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.