अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- ग्रामपंचायतीकडे माहितीच्या अधिकारात मागितलेली घरकुलाची माहिती न देणे एका ग्रामसेवकास चांगलेच महागात पडले आहे.
याप्रकरणी अर्जदारास माहिती देण्यास हेतुपुरस्पर टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत संबंधित ग्रामसेवकास नाशिक खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्तांनी दहा हजाराचा दंड केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील धायतडकवाडी येथील नारायण साबळे यांनी सन २०१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मिळणेबाबत अर्ज सादर केला होता.
धायतडकवाडी गावची ग्रामपंचायत असलेली अकोला ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या ग्रामसभेत त्या अर्जावर काय चर्चा व ठराव घेण्यात आला. तसेच ग्रामपंचायत कार्यसुची इतिवृत्तामध्ये काय नोंद करण्यात आली.
यासंबंधित माहिती साबळे यांनी २ जुलै २०१८ रोजी माहितीच्या अधिकारात अर्ज टाकून मागितली होती. मात्र अकोला ग्रापंचायतीचे ग्रामसेवक तिडके यांनी साबळे यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली.
यासंदर्भात अर्जदार साबळे यांनी राज्य माहिती आयोग नाशिकच्या खंडपीठाकडे अपील केले. यात अर्जदार यांना माहिती देण्यास हेतुपुरस्पर टाळाटाळ केल्याचे स्पष्ट झाल्याने
तिडके यांच्यावर नाशिक खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्त के.एल .बिश्नोई यांनी दहा हजाराचा दंड करुन कारवाई केली आहे.तिडके यांच्या वेतनातुन ही रक्कम कपात करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांत चांगलीच खळबळ उडाली आहे.