अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- विक्रीच्या उद्देशाने साठा केलेला ९ लाख ३० हजार ९१० रुपये किंमतीचा गांजाचा साठा संगमनेर खुर्द येथे पोलिसांनी जप्त केला आहे.
मात्र या कारवाईची कुणकुण लागताच दोन आरोपी पसार झाले असून, यात एका महिलेचा देखील समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात शनिवारी पहाटे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांना संगमनेर खुर्द शिवारामध्ये सिमा पंचारीया, राजु चव्हाण व आणखी एक इसम यांनी पंचारीया हिच्या घरामध्ये अंमली पदार्थाचा साठा केल्याची माहिती मिळाली होती.
निरीक्षक देशमुख यांनी ही माहिती पोलीस पथकाला देत कारवाईसाठी पाठविले. पोलीस पथकाने घटनास्थळी जात मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला असता घटनास्थळावरुन सिमा पंचारीया व राजु चव्हाण यांनी पळ काढला.
लाईट नसल्याने पोलीसांनी टॉर्चच्या सहाय्याने घराची झडती घेतली असता आतल्या खोलीत काळपट हिरव्या रंगाची पाने, फुले, काड्या व बिया आढळुन आल्या.
त्याचा वास घेतला असता पोलिसांना सदरचा उग्र वास हा गांजाचा असल्याचे लक्षात आले. दोन गोण्यांमधुन पोलिसांनी ४६ किलो ४२५ ग्रॅम वजनाचा गांजा ताब्यात घेतला आहे.
या गांजाचे बाजारभावाने मुल्य ९ लाख ३० हजार ९१० रुपये असल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी गांजाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत.