अहमदनगर क्राईम

‘पटवर्धन’ पतसंस्था गैरव्यवहार: ‘त्या’ चार आरोपींना न्यायालयीन कोठडी: इतरांचा शोध सुरू

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :-  रावसाहेब पटवर्धन पतसंस्था व विलिनीकरणानंतर प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी चौघांना अटक केल्यानंतर इतर संचालक पसार झाले आहेत.

आठ दिवसानंतरही त्यांचा पोलिसांना शोध लागला नाही. दरम्यान या गुन्ह्यात अटक केलेल्या पतसंस्थेच्या अध्यक्षा लतिका नंदकुमार पवार, उपाध्यक्ष सुभाष विद्याधर रेखी, संचालक प्रकाश नथ्थू सोनवणे, लक्ष्मण सखाराम जाधव यांच्या पोलीस कोठडीची मुदत गुरूवारी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

न्यायालयाने या चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांचे पैसे परत न दिल्यामुळे रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांच्यासह 30 जणांविरोधात येथील तोफखाना पोलीस ठाण्यात 7 ऑगस्ट 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी ठेवीदार इस्माईल गुलाब शेख (रा. तारकपूर) यांनी फिर्याद दिली होती. तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान या गुन्ह्याचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले आहे. त्या अहवालानुसार निष्पन्न झालेल्या दोषींना अटक केली जात आहे.

चौघांना अटक झाल्यानंतर इतर आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान त्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office