अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- नेवासा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या दालनात अनधिकृतरित्या व्हिडीओ सूट केल्याप्रकरणी तसेच पोलिसास धक्का दिल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी गोवर्धन पवार यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कुकाणा दूरक्षेत्राच्या जागेवर असलेल्या अनधिकृत टपन्या हटविण्याच्या नोटिसा देऊन शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास टपरीधारकांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते.
यावेळी १५ ते २० टपरीधारक पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या दालनात गेले असता त्यांच्या मागे अधिकारी व कर्मचारी पोलीस निरीक्षकांच्या दालनात गेले.
त्यावेळी पोलीस निरीक्षक पोवार हे टपरीधारकांना कायदेशीर सूचना देत असताना टपरीधारकांपैकी दोघेजण मोबाईलमध्ये विनापरवाना व्हिडीओ चित्रिकरण करत होते.
त्यांच्याकडे विचारणा केली असता “तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? दूरक्षेत्राच्या जागेवरील आमच्या टपन्या काढणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा” अशी धमकी देत पोलीस कर्मचारी पवार यांना ढकलून दिले. त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले.
त्यावेळी त्यांची नावे विचारली असता अन्सार अल्लीभाई इनामदार व बाळासाहेब रावसाहेब जावळे (दोघे रा. कुकाणा) असे सांगितले. या दोघांकडून सदर मोबाइल पंचनामा करून जप्त करण्यात आले आहे. तसेच तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.