Ahmednagar Crime : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील गिते मळ्यातील शिक्षकाच्या घरी दरोडा पडला. शुक्रवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून सुदर्शन गीते यांच्या घरातील दागिने व रोख रक्कम असे मिळून दिड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेने सोनगाव, सात्रळ पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे..
याबाबत राहुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सात्रळ – इरिगेशन बंगला रस्त्यावरील गीते मळा येथे शिक्षक गीते राहतात. ते सात्रळ येथील रयत संकुलात शिक्षणसेवक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी रात्री १० वाजता पत्नी प्रियंका, आई सुनीता यांच्यासह जेवन करून गीते झोपी गेले.
रात्री एक वाजता किचनच्या दरवाज्याची कडी कोंडा तोडून सहा जणांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. या आवाजाने गीते उठले. तेव्हा दरोडेखोरांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला.
त्यांची आई व पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असे ९० हजार रुपयाचे दागिने २० हजार रुपये रोख व दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पळून गेले.
दरोडेखोर गेल्यावर गीते कुटुंबीयांनी घडलेला प्रकार आजूबाजूच्या नागरिकांना सांगितला. ग्रामस्थांनी तात्काळ राहुरी पोलिसांना फोन केला. घटनेची खबर मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
आजूबाजूच्या परिसराची नाकी बंदी केली. काल दिवसभरात अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी बसवराज शिवपुंजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी गीते यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ६ दरोडेखोरांवर गुन्हा करण्यात आला आहे.