अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- जिलेटिनच्या साह्याने एटीएममध्ये स्फोट घडवून चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे घडली.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, या घटनेने पोलीस यंत्रणाही हादरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, लोणी खुर्दमधील वेताळबाबा चौकात असलेल्या टाटा प्रॉडक्ट इंडिकॅश कंपनीचे एटीएम आहे.
रविवारी ( ता. 10 ) पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून हे एटीएम फोडल्याची फोडले. त्यानंतर त्यातील रोकड लंपास केली.
चोरट्यांनी आधी एटीएमशेजारील घरांच्या बाहेरून कड्या लावल्या, तसेच सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारला. स्फोटाच्या आवाजाने नागरिकांनी घराबाहेर येण्याचा प्रयत्न केला, मात्र कड्या बाहेरुन लावलेल्या असल्याने चोरट्यांना लुटीसाठी वेळ मिळाला.
एटीएम फोडल्याची माहिती लोणी पोलिसांना मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे.
दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात एटीएम चोऱ्यांच्या घटना वाढल्या होत्या. नंतर काही काळ या घटना थांबल्या होत्या मात्र आता पुन्हा एटीएम चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांत घरेच काय बँकेचे एटीएमही सुरक्षित नसल्याची भावना निर्माण होऊ लागली आहे.