Crime News : शिर्डीमध्ये लोणी येथील दोन युवकांची हत्या करून दोनही मृतदेह गोणीत भरून कसारा घाटात फेकून दिल्याची घटना सोमवारी समोर आली असून खून झालेले दोन्ही जण राहाता तालुक्यातील व आरोपी शिर्डीतील असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की २९ जून २०२३ रोजी कसारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस पेट्रोलिंग करत असताना एका इसमाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह असल्याचं सांगितलं होतं.
त्यावेळी याठिकाणी कसारा पोलिसांनी पाहणी केली असता त्या दोघांचाही खून झाल्याचं आढळून आलं होतं. हे अनोळखी मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी पंचनामा केला. पोलिसांनी योग्य प्रकारे तांत्रिक तपास केला.
यात मुख्य आरोपी मनोज नाशी असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या दुहेरी हत्याकांडाचा तपास गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होता.
ताब्यात घेतलेल्या आरोपीने घटनेची माहिती देताना आपल्या बहिणीला दोन तरुण सोशल मीडियाच्या आधारे त्रास देत होते व याचाच मनात राग धरून सुफीयान सिराबक्ष (वय ३३, रा. लोणी, तालुका राहाता) व साहिल पठाण (वय २१, रा. सोनगाव, तालुका राहुरी) या त्रास देणाऱ्या तरुणांची हत्या केल्याची कबुली आरोपी मनोज नाशी याने दिली.
या हत्याकांडात शिर्डी येथील कुणाल प्रकाश मुदलियार, प्रकाश अंबादास खलूले, फिरोज दिलदार पठाण हे सहभागी असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रमेश दळवी यांनी दिली आहे.