मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून झोपेत असलेल्या पतीचा पत्नी आणि मुलांसमोर कोयत्याने वार करून खून केला. श्रीगोंदे तालुक्यातील कोथूळ येथे भोसले वस्तीजवळ सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. योगेश सुभाष शेळके असे मृताचे नाव आहे.
अधिक माहिती अशी : योगेश सुभाष शेळके हा पाच वर्षापासून कोथूळ या ठिकाणी राहत होता. सोमवारी रात्री तो, त्याची पत्नी आरती, दोन मुले आणि वडील जेवण करून झोपले होते. दोन अडीचच्या सुमारास आवाज झाल्याने आरती शेळके यांनी दरवाजा उघडला.
त्यावेळी तेथे काळे कपडे घातलेले चार जण हातात कोयते घेऊन उभे होते. त्यातील एकाने आरती यांच्या गळ्याला कोयता लावून घरात प्रवेश करीत झोपेत असलेल्या योगेशच्या गळा व हातापायावर वार केले. यात योगेश जागीच ठार झाला. त्यानंतर आरोपी पसार झाले.
या घटनेनंतर आरती यांनी आरडाओरडा करून शेजारी राहणाऱ्या लोकांना बोलाविले. या घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे, उपनिरीक्षक गाजरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, डीवायएसपी विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या.
पोलीस म्हणतात..
दोन संशयतांना ताब्यात घेतले असून काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. त्या दिशेने तपास सुरू केला आहे. या घटनेमध्ये घरातील कोणालाही मारहाण केली नाही. घरातील कुठलेही दागिने चोरीस गेले नाहीत.
बेलवंडी पोलिसांची चार पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके आरोपींच्या मागावर असून लवकरच उर्वरित आरोपींना गजाआड केले जाईल असे बेलवंडीचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी म्हटले आहे.