Ahmednagar Crime : उसनवारीच्या पैशावरून कोयत्याने वार ; एकजण जखमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Crime : उसनवारीच्या पैशातून कोयत्याने वार केल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना नगर तालुक्यातील बहिरवाडी शिवारात शुक्रवार (दि. १९) रोजी घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बहिरवाडी येथील अशोक श्रीमंत दारकुंडे (वय ४९), हे गावातीलच हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना वाकी वस्ती ते काटवन, जाणाऱ्या रस्त्यावर गणपत वाघ यांच्या शेताजवळ विकास अंकुश काळे (रा. बहिरवाडी ता. नगर) व त्याच्यासोबत असलेल्या अनोळखी इसम यांनी उसनवारीच्या पैशांवरून अशोक दारकुंडे यांच्याशी वाद घातला.

या वेळी आरोपींनी दारकुंडे यांच्या मानेवर कोयत्याने गंभीर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. यात अशोक दारकुंडे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अशोक दारकुंडे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून विकास अंकुश काळे (बहिरवाडी) व अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलिसांकडून सुरू असून, कोयत्याने वार केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.