अहमदनगर क्राईम

शेतकऱ्याला भरदिवसा लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केले ४८ तासात जेरबंद !

Published by
Ahmednagarlive24 Office

जामखेड येथून कांदे विकून घरी नान्नजकडे येणाऱ्या शेतकऱ्याला मोटारसायकलवर आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा लुटून शेतकऱ्याकडील १ लाख ६० हजार रुपयांची रोकड लुटली होती.

परंतू पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी ४८ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे. पारस छगन भोसले व दीपक पवार, रा. आरोळे वस्ती, जामखेड, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस हेडकॉन्स्टेबल अजय साठे, पोलिस हेडकॉन्स्टेबल इंगळे, पो. नाईक संतोष कोपनर, पो. नाईक जितेंद्र सरोदे, पो. अंमलदार देवा पळसे, यांनी ही करवाई केली.

गुन्हा घडल्यापासून पारस छगन भोसले व दीपक पवार, हे दोन्ही आरोपी दोन दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. पो. नि. महेश पाटील यांच्या पथकाने आरोपींचा कसून शोध घेतला.

हे आरोपी जामखेड शिवारातील आयटीआयजवळील काळेवाडी तलाव परिसरातील म्हसोबा मंदिराच्या परिसरात असल्याची माहिती मिळताच पोहेकॉ. इंगळे, पोना. संतोष कोपनर, पोना. जितेंद्र सरोदे, पो. अंमलदार देवा पळसे, यांनी आपल्या जीवाची बाजी लावून आरोपींचा पाठलाग करून आरोपींना जेरबंद केले.

या आरोपींकडून लवकरच इतरही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले आहे असे देखील सूत्रांकडून समजले.

Ahmednagarlive24 Office