Ahmednagar Crime : अहमदनगरसह राज्यात चर्चेत असणाऱ्या राहुरी तालुक्यातील मानोरी येथील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणातील पाचवा आरोपी राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की मानोरी येथील वकील दाम्पत्याचा पाच लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना दि. २५ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सराईत आरोपी व त्याचे ३ साथीदार २४ तासांच्या आत जेरबंद केले होते.
पाचवा आरोपी पसार होता. या पाचवा आरोपी कृष्णा ऊर्फ बबन सुनील मोरे (राहणार उंबरे) याच्या ठावठिकाऱ्याबाबत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाल्याने या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशनचे तपास पथक व वांबोरी बीटच्या पथकाने त्यास तात्काळ अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, हेड कॉन्स्टेबल पारधी, कॉन्स्टेबल अंकुश भोसले, सतीश कुराडे, हेड कॉन्स्टेबल विकास साळवे, अशोक शिंदे, पोलीस नाईक नागरगोजे, पाखरे, बागुल यांनी केली.
एकाही वकिलाने वकीलपत्र घेतले नाही
न्यायालयाने मुख्य आरोपीला १० दिवसांची तर इतर आरोपींना अटींवर एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (रा. उंबरे), भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे (रा. येवले आखाडा),
शुभम संजीत महाडिक (रा. मानोरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे) अशी सुरुवातीला पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयातील एकाही वकिलाने आरोपीचे वकीलपत्र घेतले नाही. त्यामुळे दुपारी साडेतीन वाजेपर्यंत न्यायालयीन कामकाज ठप्प राहिले होते.