अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर शहरातील सुरु असलेले कत्तलखाने गेल्या अनेक दिवसांपासून चांगलेच चर्चेत होते. यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली होती. दरम्यान नुकतेच यासाठी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता.
आता या मागणीला यश आले आहे. आज नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने फौजफाट्यासह जाऊन जमजम कॉलनी परिसरातील पाच कत्तलखाने उद्ध्वस्त केले आहे. महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेरात मात्र या कायद्याचे पालन केले जात नाही.
शहरातील जमजम कॉलनी, जोर्वे रोड, कोल्हेवाडी रोड या परिसरात खुलेआम बेकायदेशीर कत्तलखाने सुरू होते. या कत्तलखान्याला मधून दररोज अनेक गोवंश या जातीच्या जनावरांची कत्तल करण्यात येत होती. या कत्तलखान्यात तयार झालेले हजारो किलो गोमांस दररोज वेगवेगळ्या वाहनांमधून मुंबई,
ठाणे, गुलबर्गा आदी ठिकाणी निर्यात करण्यात येत होते. यामुळे राज्यामध्ये संगमनेरची वेगळी ओळख निर्माण झाली होती. याबाबत शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी वेळोवेळी आवाज उठवूनही पोलिसांनी कठोर कारवाई केलेली नव्हती.
दरम्यान सर्व बेकायदेशीर कत्तलखाने नष्ट करावे, कत्तलखाना चालविणार्यांना पाठीशी घालणारे पोलीस अधिकार्यास निलंबीत करावे, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या आंदोलनाला पहिले यश आले आहे. या कारवाईनंतर पोलीस अधिकार्यांवर केव्हा कारवाई होते याकडे आंदोलनकर्त्यांची लक्ष आहे.