अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- कर्जत तालुक्यात एक फसवणुकीची घटना घडली आहे. उडीद विकून गावाकडे जाण्यासाठी गाडीला थांबले असताना मोटारसायकलवर आलेल्या एका इसमाने लिफ्टच्या बहाण्याने तब्बल २२ हजार लुटून नेल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी, दुपारी ४ वाजता जळकेवाडी येथील पोपट मारुती ढवळे हे उडीद विकून गावाकडे जाण्यासाठी गाडीला थांबले होते.
तेव्हा ४० ते ५० वय असलेली एक अज्ञात व्यक्तीने त्यांच्याजवळ मोटारसायकल थांबवली. मी चापडगावला चाललो आहे, तुम्हाला जळकेवाडी फाटा येथे सोडतो असे म्हणून त्यांना गाडीवर बसवले.
गाडीवरून जात असताना त्यांनी नेवसे वस्ती फाट्याजवळ गाडी थांबवून पेट्रोल संपले आहे असे त्यांना सांगितले. २ हजारांची नोट आहे, पण सुट्टे पैसे नाहीत असे म्हटले.
त्यावेळी ढवळे यांनी उडीदाच्या पट्टीतील सुट्टे पैसे काढले असता तो इसम म्हणाला, बाबा मी पैसे मोजून घेतो. तेवढ्यात त्याने सर्व २२ हजार ८८० रुपये हातात घेवून खिशात टाकले व मोटारसायकलवरून निघून गेला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.