अहमदनगर क्राईम

पोटच्या दोन मुलांचे मृतदेह दिसताच आईने फोडला हंबरडा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :-  राहुरी शहर हद्दीतील मुळा नदीपात्रून दोन सख्खे भाऊ पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना मंगळवारी घडली होती. आज दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी मोठा भाऊ अमर याचा मृतदेह गणपती घाट परिसरात तर लहान भाऊ सुमित याचा मृतदेह मुळा देवनदी संगमा जवळ पाण्यावर तरंगत असताना आढळून आला.

दोन्ही मुलांचा मृतदेह पाहून त्यांच्या आईने व नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला होता. राहुरी शहर हद्दीतील बारा ते पंधरा वयोगटातील पाच मुले शहरातील गणपती घाट परिसरात मुळा नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पाच मुलां पैकी अमर व सुमित हे दोघे सख्खे भाऊ पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना काल दिनांक ५ ऑक्टोबर रोजी दुपारी दिड वाजे दरम्यान घडली होती.

राहुरी शहरातील लोहार गल्ली परिसरात राहणारे अमर चंद्रकांत पगारे, सुमित चंद्रकांत पगारे, समीर सचिन खंडागळे, शाहीर सचिन खंडागळे तसेच रिहान भैय्या शेख हे बारा ते पंधरा वयोगटातील मुलं गणपती घाट परिसरात मुळा नदी पात्रात अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरले होते.

पाण्यात अंघोळ करत असताना सुमित पगारे वय १२ वर्षे हा पाण्यात वाहू लागला. ते पाहून त्याचा भाऊ अमर वय १५ वर्षे याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतू अमर चंद्रकांत पगारे व सुमित चंद्रकांत पगारे हे दोघे सख्खे भाऊ पाहता पाहता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले पंकज नारद, उत्तम आहेर, शहारूख सय्यद, सोन्याभाई सय्यद, सिद्धार्थ करडक या तरूणांनी पाण्यात वाहून जाणाऱ्या अमर व सुमित यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतू ते दोघे भाऊ काही क्षणात पाण्यात दिसेनासे झाले.

घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील विभागीय पोलिस अधिक्षक संदिप मिटके, प्रांताधिकारी दयानंद जगताप, पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे, तहसिलदार फसियोद्दीन शेख, नगरपरिषद मधील महेंद्र तापकिरे आदिंसह महसूल, पोलिस व नगरपरिषद प्रशानाचे कर्मचारी तसेच नगरसेवक सोन्याबापू जगधने,

अक्षय तनपूरे, राजेंद्र बोरकर, सुनिल पवार, दादासाहेब करडक हे घटनास्थळी दाखल झाले होते. प्रशासनाने काल दिवसभर पाण्यात बूडालेल्या मुलांचा शोध घेतला होता.

मात्र ते मिळून आले नव्हते. आज दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वासात वाजे दरम्यान गणपती घाट परिसरात बूडालेल्या ठिकाणापासून सुमारे दोनशे फूट अंतरावर मोठा भाऊ अमर चंद्रकांत पगारे हा पाण्यावर तरंगताना दिसून आला. यावेळी बाळासाहेब पवार,

चंद्रकांत माळी, भागवत आहेर, गोविंद पवार, राजू नारद, विशाल राऊत या तरूणांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. तसेच अकरा वाजे दरम्यान लहान भाऊ सुमित चंद्रकांत पगारे याचा मृतदेह तनपूरेवाडी रोड,

व्यंकटेश नर्सरी परिसरात गाडेकर यांच्या शेती जमिन लगत पाण्यावर तरंगताना आढळून आला. यावेळी देवा कर्डक, सुरेश वाघ, फुलसौंदर, आलम शेख तसेच स्थानिक तरूणांनी त्याला पाण्यातून बाहेर काढण्यास मदत केली.

दोन्ही मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात आणले होते. यावेळी नागरीकांनी प्रचंड गर्दी केली होती. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ahmednagarlive24 Office