Ahmednagar Crime : जून महिन्यात कोल्हार येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र खर्डे यांच्या घरी चोरी झाली होती. सदर घटनेतील तीन आरोपींना लोणी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असून रोख एक लाख त्रेचाळीस हजार व नवीन मोटारसायकल हस्तगत केल्याची माहिती लोणी पोलिसांनी दिली आहे.
राम बाजीराव चव्हाण, वय २४, तुषार हाबाजी भोसले वय २४ व रियाज बशीर शेख सर्व आरोपी राहणार आष्टी, जिल्हा बीड येथील आहेत. २४ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कोल्हार येथे जितेंद्र विष्णू खर्डे यांच्या बंगल्यातून मागील दरवाजातून आत येत सुमारे पाच तोळे सोने व साडेचार लाखांची रोख रक्कम असा अंदाजे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
यावेळी जितेंद्र खर्डे यांच्या पत्नी वैशाली यांनी चोरट्याची चाहूल लागल्याने आरडाओरडा केला. त्यामुळे चोरट्यांनी काढता पाय घ्यावा लागला होता. सदर चोरीच्या घटनेनंतर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांना व्यापारी व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. चोरीच्या घटने नंतर नगर स्थानिक गुन्हे शाखा व लोणी पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत आष्टी येथून तीन आरोपींना ताब्यात घेतले होते.
काल यातील एकास जितेंद्र खर्डे यांच्या घरी नेऊन लोणी पोलिसांनी खातरजमा करून घेतली. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा नगर व लोणी पोलीस स्टेशनचे सपोनि युवराज आठरे, पीएसआय योगेश चव्हाण, पोहेकॉ दहिफळे, पोहेकॉ चव्हाण, पोहेकॉ आव्हाड, पोका पवार यांच्या पथकाने केली. वरील तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील राम बाजीराव चव्हाण यांचेवर घरफोडी, दरोडा यासारखे राहुरी, पाथर्डी, नगर, जामखेड, श्रीगोंदा, कर्जत, लोणी असे २४ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.