कोपरगाव येथील एका ज्येष्ठ पत्रकार यांच्या धारणगाव रस्त्यानजीक असलेल्या बंगल्यावर पाच ते सात चोरट्यांनी रात्री १ वाजता कडी- कोयंडा तोडून ५० हजारांची चांदी व चांदीचे भांडे, १५ हजार रुपये रोख रक्कम व २ हजार अमेरिकन डॉलर (अंदाजे किंमत १ लाख ६० हजार) असा ऐवज चोरून नेला आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, की हे ज्येष्ठ पत्रकार सध्या प्रकृतीच्या कारणामुळे मुलाकडे पुणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा धारणगाव रस्त्यालगत मोठा बंगला आहे. तेथे बंगल्याला राखणदार म्हणून वॉचमन देखील ठेवला आहे.
मात्र अज्ञात पाच ते सात चोरट्यांनी पाळत ठेवून रात्री बंगल्याच्या दरवाज्याचा कडीकोयंडे तोडून बंगल्यात प्रवेश करून घरातील कपाटातील सामानाची उचकपाचक करून त्यातील ५० हजार रुपये रकमेची चांदी, चांदीचे भांडे, १५ हजार रुपये रोख रक्कम, २ हजार अमेरिकन डॉलर (अंदाजे किंमत एक लाख साठ हजार रुपये) अशा किंमतीचा ऐवज चोरून नेला.
चोरटे घरातील टीव्हीदेखील चोरून नेत होते; मात्र आवाजाने वॉचमन जागा झाल्याने टीव्ही बंगल्याच्या परिसरातच सोडून त्यांनी पळ काढला. याबाबत पत्रकाराच्या पुतण्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.