अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- चोरट्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी नुसता धुमाकूळ घातला असून एकाच रात्री अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहेत.(Ahmednagar Crime)
दोन दिवसांपूर्वीच श्रीगोंदा व त्यापाठोपाठ श्रीरामपूर,राहाता या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. अद्याप या घटनाचा तपास लागत नाही तोच आता संगमनेर तालुक्यात देखील चोरट्यांनी धुमाकूळ घालत मोठा मुद्देमाल लंपास केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील वडगावपान फाटा परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या करुन लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.
या परिसरातील राहीवाशी संजय थोरात यांच्या घराचा मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करीत साहित्याची उचकापाचक केली.
चोरट्यांनी घरातील सदस्यांना धमकावुन स्वाती थोरात यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने तसेच घरातील दीड तोळे सोन्याचे व आठ भार चांदीचे दागिन्यासह ५०० रुपये रोख रक्कम घेवुन पसार झाले.
त्यानंतर काही वेळाने चोरट्यांनी प्रमोद थोरात व गणेश थोरात यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रमोद हे जागे झाल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला.
त्यानंतर येथिल विद्यालय परिसरात बाळासाहेब थोरात यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत उचकापाचक केली. घरातून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने व ३० हजार रुपये रोख रक्कमेचा ऐवज घेवून चोरट्यांनी धुम ठोकली.