Ahmednagar News : अहमदनगर शहरातील गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढत चाललेला दिसतो. शहरातील गुन्हेगारी वृत्तीच्या काही घटना ताजा असतानाच आता मार्केट यार्डजवळ दोघांवर चाकूने वार केल्याची घटना समोर आली आहे. खिशातून बळजबरीने काढून घेतलेले पैसे परत मागितल्या रागातून चार जणांनी चाकू, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने माहराण करण्याची घटना घडली आहे.
२६ जानेवारीला सायंकाळी साडेसातच्या दरम्यान मार्केट यार्डसमोर घडली. याप्रकरणी वैभव पाचारणे (रा. वैष्णव नगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश पोटे (रा. कानडे मळा, सारसनगर), बिरजू गायकवाड व दोन अनोळखी इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अधिक माहितीनुसार फिर्यादी पाचारणे हे त्यांचे मित्र आकाश गायकवाड आणि अविनाश औटी यांच्यासह मोपेडवरून साऊंड सिस्टीमचे पैसे आणण्यासाठी चालले होते. मार्केट यार्ड गेटसमोर पोटे व गायकवाड यांनी आवाज दिला. त्यामुळे ते उभे असलेल्या चहाच्या टपरीवर हे गेले.
पोटे याने फिर्यादीच्या खिशातून बळजबरीने ३ हजार ५०० रूपये काढून घेतले. त्यास पैसे परत मागितले असता त्यास राग येऊन तो चाकू गायकवाड यास मारू लागला. तेव्हा गायकवाडने सदरचा वार अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या उजव्या हातावर चाकू लागला.
त्यानंतर पोटे याने औटी यास हातातील चाकू मारत असताना अविनाशने वार हुकवण्याचा प्रयत्न केला. अविनाशच्या डाव्या हाताच्या मनगटावर व उजव्या हाताच्या तळहातावर चाकू लागल्याने तो जखमी झाला. गायकवाड याने लाकडी दांडक्याने व इतर अनोळखी दोघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये फिर्यादीच्या पायाला मुका मार लागल्याने दुखापत झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.