अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- केडगाव बायपासवर करण्यात आलेल्या कारवाईत कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये पसार असलेला आरोपी राजेंद्र अशोक साबळेसह चौघांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
मात्र वाटेफळ बायोडिझेलप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात राजेंद्र साबळेसह चौघांना जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिली.
दरम्यान नगर ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर तालुक्यातील वाटेफळ शिवारात पकडलेल्या बायोडिझेल प्रकरणात महेंद्र नरसू कोळेकर (रा. मुंबई) याला नगर तालुका पोलिसांनी कोतवालीच्या गुन्ह्यातून वर्ग करून घेत अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आतापर्यंत या गुन्ह्यात 17 आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. यातील 13 आरोपींना अटक करण्यात आली असून राजेंद्र अशोक साबळेसह चौघे पसार आहेत. या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी करत आहे. नगर शहरात बायोडिझेल विक्रीचे मोठे रॅकेट पुरवठा विभाग व पोलिसांनी समोर आणले आहे.
याची व्याप्ती वाढत आहे. रस्त्याच्या बाजुला खुलेआम बायोडिझेल विकणार्या तस्करांवर पथकाने छापा टाकला होता. या कारवाईत बायोडिझेल, रोख रक्कम, टँकर, ट्रक, कार असा एक कोटी 75 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुरूवातीला केडगाव बायोडिझेल प्रकरणात असलेला संजय साबळे याला वाटेफळ बायोडिझेल प्रकरणात वर्ग करून घेण्यात आले आहे. आता आरोपी कोळेकर याला वर्ग करून घेत अटक करण्यात आली आहे.