Ahmednagar Crime : रस्तापूर (ता. नेवासा ) येथे जमिनीच्या वादातून मारहाण करून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी शिंगणापूर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश पावलस शिंदे (वय ५५, रा. रस्तापूर, ता. नेवासा) यांनी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, (दि.१०) ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता चंद्रशेखर डॅनियल पातारे,
शिवाजी दशरथ गायकवाड व इतरांवर ५० ते ६० अनोळखी इसमानी संगनमत करून गैरकायद्यायची मंडळी जमवून फिर्यादीस तुम्ही राहत असलेले शेत गट नंबर २५८ सर्वे नंबर ४३ ही जमीन आम्ही विकत घेतलेली आहे.
त्यामुळे तुम्ही शेतामध्ये राहू नका, असे सांगत फिर्यादी व फिर्यादीची पत्नी दोन मुलगे व फिर्यादीचा भाऊ यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या पत्नी समूला स्मरण केली व
घरात घुसून संसार उपयोगी साहित्याची मोडतोड करून घरातील ४० हजार रुपयांची रोख रक्कम, १५ हजार रुपयाचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र १०, हजार रुपयाचे मोबाईल फोन, ५ हजार रुपयांचे धान्य व कापूस, असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
याप्रकरणी शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल डी. एम. माळवे पुढील तपास करीत आहे.