अहमदनगर क्राईम

जेवायला गेले अन झाला वाद… संतापात प्राध्यापकाने पदाधिकार्‍याच्या डोक्यात बाटली फेकून मारली

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात एका कार्यक्रमानंतर जेवणाला गेलेल्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यामध्ये प्राध्यापक असलेल्या एका कार्यकर्त्याने एका पदाधिकार्‍याच्या डोक्यात बाटली फेकून मारली.

पदाधिकारी जखमी झाल्याने पदाधिकार्‍याच्या समर्थकांनी प्राध्यापक असलेल्या कार्यकर्त्याला व त्याच्या साथीदारांना बेदम मारहाण केली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तळेगाव दिघे येथे झालेल्या एका कार्यक्रमासाठी काही प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी संगमनेरातून गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर ते वेगवेगळ्या गटाने वेगवेगळ्या ठिकाणी जेवणासाठी गेले होते.

जेवणाआधी एका चर्चेतून प्राध्यापक कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्यात वादाची ठिणगी पडली. यातून प्राध्यापक कार्यकर्त्याने जिल्हा पदाधिकार्‍याच्या डोक्यात बाटली फेकून मारली.

त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक चकमक उडत हाणामारी झाली. याबाबत समजताच समर्थक मोठ्या संख्येने तळेगाव येथे गेले. तेथे त्यांनी प्राध्यापक कार्यकर्ता व त्याचे समर्थक यांची यथेच्छा धुलाई केली.

तेथून हे सर्मथक संगमनेरात दाखल झाले. प्राध्यापक कार्यकर्त्याच्या घरासमोर देखील त्यांनी राडा केला. यामध्ये दुचाकी वाहनाचे नुकसान झाले.

त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. याबाबत रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल झाली नसल्याचे समजते.

Ahmednagarlive24 Office