Ahmednagar Crime : कारागृहातून आरोपींना पळून जाण्यास कट्टा आणि हेक्सा ब्लेड कोणी पुरवले ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Crime : संगमनेर शहर पोलिस स्टेशनच्या कारागृहातून ४ आरोपींना पळवण्यात मदत करणारे आणखी ३ आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. तर अन्य एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेतील आरोपींची संख्या एकूण १० झाली.

हलीम अकबर पठाण, कलीम अकबर पठाण (संगमनेर), प्रथमेश राऊत (घुलेवाडी) या तिघांना शनिवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींना पळून जाण्यात या तिघांनी मदत केली.

अन्य एक आरोपी अद्यापही फरार आहे. पळून जाणाऱ्या ४ आरोपी सोबत वरील तिथे आरोपी काही काळ कारागृहात एकत्र होते. त्या दरम्यान त्यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. यातूनच त्यांनी आरोपींना पळून जाण्यासाठी गाडी, पैसे व इतर व्यवस्था केली.

राहुल देविदास काळे, रोशन रमेश ददेल, अनिल छबू ढोले, मच्छिंद्र मनाजी जाधव, अल्ताफ आसिफ शेख, मोहनलाल नेताजी भाटी यांची आज मंगळवारी पोलिस कोठडी संपणार आहे. तर नव्याने ताब्यात घेतलेल्या तिघांना १ दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली.

या घटनेतील आणखी एक सूत्रधार सलीम अकबर पठाण हा फरार आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतरच गावठी कट्टा, ब्लेड व इतर साहित्य जेलमध्ये कसे आले, याचा उलगडा होणार आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली २४ तासात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन या प्रकरणाचा छडा लावल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत सर्व माहिती घेऊन पोलिसांना सूचना केल्या. ५८ आरोपी सध्या जेलमध्ये आहेत. कारागृहाची क्षमता फक्त २४ आहे. संगमनेर कारागृहाला स्वतंत्र जेल पोलिसांची नियुक्ती आवश्यक आहे. ही व्यवस्था नसल्यामुळे इतर पोलिस स्टेशनला सुरक्षा व्यवस्थेचा अतिरिक्त भार आहे.

कोपरगाव येथे जेलचे काम सुरू आहे. हे काम ३ महिन्यात पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले होते. ऑगस्ट महिन्यात हे काम पूर्ण होणार होते. मात्र अद्यापही या जेलचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील अंदाजे २४-२५ आरोपी या जेलमध्ये आहे…

संगमनेर जेलची सुरक्षा व्यवस्था तहसीलदार व स्थानिक पोलिसांकडे आहे. मात्र, अहमदनगर खेरीज कोणत्याही जेलला स्वतंत्र जेल पोलिसची व्यवस्था नाही. त्यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतो.

अतिरिक्त आरोपी व कुमकुवत सुरक्षा व्यवस्था याचाच गैरफायदा घेऊन आरोपी पळून जाण्यात यशस्वी होतात. संगमनेर जेलला ४ बराकी आहेत. एक बराकीमध्ये महिला आरोपी आहेत.

त्यामुळे इतर ३ बराकीमध्ये ५५ आरोपी आहे. ही संख्या मोठी आहे. या संदर्भात संपूर्ण परिस्थितीची माहिती न्यायालयालाही पत्राद्वारे कळवण्यात आले असल्याचे संगमनेर कारागृहाचे जेलर भाऊसाहेब बलसाने यांनी सांगितले.

कारागृहाचे कापलेले गज पुन्हा नवीन टाकण्यात आले. सुरक्षेतेच्या दृष्टीने कारागृहांच्या उभ्या गजांना आणखी आडवे गज लावण्यात आले. व ज्या कुलरच्या आडून गज कापण्यास मदत झाली, तो कुलर तेथून हटवण्यात आला.

बाहेरील चॅनल गेटला सातत्याने कुलूप लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नातेवाइकांखेरीज बाहेरील कोणालाही आता आरोपींपर्यंत संपर्क करता येणार नाही. जेल परिसरात पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली.