अहमदनगर क्राईम

Ahmednagar Crime News : बसमधून महिलेचे दीड तोळ्याचे दागिने लंपास

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Crime News : एसटी बसमधून प्रवास करत असलेल्या तांदुळनेर- तांभेरे येथील एका महिलेच्या बॅगमधील दीड तोळा वजनाचे सोन्याचे मनिमंगळसूत्र व रोख रक्कम अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार खूर्द ते विद्यापीठ दरम्यान घडली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की त्रिवेनी सतिश नन्नावरे या राहुरी तालुक्यातील तांदुळनेर तांभेरे येथे राहातात. त्यांना कामानिमित्त त्यांच्या माहेरी बिड जिल्ह्यातील आष्टी येथे जायचे होते.

त्यामुळे त्या राहता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील बस स्थानकावरून नाशिक- सोलापूर एसटी बसमध्ये बसल्या. एसटी बस राहुरी बस स्थानक येथे काही वेळ थांबली. त्यावेळी त्रिवेनी नन्नावरे यांनी ४ हजार ३५० रुपये रोख रक्कम व त्यांच्या गळ्यातील मनिमंगळसूत्र काढून त्यांच्या बॅगेत ठेवले.

एसटी बस पुढे जाण्यासाठी निघाली. राहुरी बस स्थानक ते राहुरी विद्यापीठ या दरम्यान अज्ञात भामट्याने त्यांच्या बॅगमधील दीड तोळा वजनाचे सोन्याचे मनिमंगळसूत्र व ४ हजार ३५० रुपये रोख रक्कम चोरून नेली. एसटी बस विद्यापीठ येथे गेली, तेव्हा त्रिवेनी नन्नावरे यांनी बॅग तपासली असता बॅगमधील मनिमंगळसूत्र चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

नन्नावरे यांनी ताबडतोब राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा रजि. नं. २३५/२०२४ नुसार भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Ahmednagarlive24 Office