एमआयडीसीतून मुख्य अभियंता या पदावरून निवृत्त झालेल्या मामाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) भीती दाखवत त्याच्याकडून एक कोटीची खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मंगेश अरुण थोरात (२९, रा. पाइपलाइन रोड, यशोदानगर, सावेडी रोड, अहमदनगर) असे या भाच्याचे नाव असून त्या भाच्याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली. आरोपीला २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
सुभाष तुपे (५९) हे ठाण्याच्या पाचपाखाडी भागातील रहिवासी आहेत. ते एमआयडीसीतून मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले असून त्यांची पत्नी जयश्री तुपे यांनी देखील एमआयडीसीमधून कार्यकारी अभियंता पदावरून राजीनामा दिला आहे.
तुपे दाम्पत्याने त्यांचा भाचा मंगेश याला व्यवसायासाठी ६१ लाख रुपये दिले व त्यांनी पुनीत कुमार (रा. उत्तर प्रदेश) याच्याकडे व्यवसायाच्या निमित्ताने एक कोटी २५ लाखांची गुंतवणूक करून ठेवलेली होती.
तसा करारही त्यांच्यात केलेला होता. परंतु, कालांतराने पुनीत कुमार त्यांना पैसे परत देत नसल्यामुळे तुपे दाम्पत्याने हे पैसे काढून देण्यासाठी त्यांचा भाचा मंगेशकडे हा करार देऊन काही रक्कमही दिली होती.
परंतु या भाच्यानेच जयश्री यांनी दिलेल्या करारनाम्याचा गैरफायदा घेण्यास सुरवात केली. त्याने त्यांच्या संभाषण रेकॉर्डिंगचा आधार घेत २२ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान तुपे दाम्पत्याला एसीबीमध्ये तक्रार आणि बदनामीची तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. तर, आरोपीला दिलेले उसने पैसे परत मागू नये म्हणून त्याने दाम्पत्याकडे एक कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. अखेर आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.