Shirdi Crime : श्री साबाबांच्या शिर्डीत गुन्हेगारी फोफावली असून आता पुण्यातील कोयता गँगसारखी गँग शिर्डीतही पहावयास मिळत आहे.
साईमंदिर परिसरात पालखी रोडवर तलवारी, चॉपर घेऊन २४ वर्षीय तरुणावर तिघा जणांनी जोरदार हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. शिर्डी पोलिसांनी तिनही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शिर्डी शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढतच आहे. मागच्या पोलीस अधिकाऱ्यांनी शहरात गुन्हेगारी कमी केली होती; मात्र मागील काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारांनी पुन्हा वर तोंड काढले आहे.
दोन दिवसांपूर्वी भल्या पहाटे नगर- मनमाड महामार्गालगत साई मंदिर प्रवेशद्वार क्रमांक एक समोरच्या चहावाल्यावर अज्ञात इसमांनी धारधार शखाने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता सोमवारी सायंकाळी मंदिर परिसरात पालखी रोडवर तलवारी, चॉपर घेऊन सुदर्शन शशिकांत वाणी (वय २४, रा. शिर्डी) या तरुणावर प्राणघातक हल्ला केला.
याबाबत फिर्यादी सुदर्शन वाणी यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की ओळख असलेल्या निखिल महादेव सोनवणे,
आर्यन राजकुमार पाटील, प्रदिप सुनील सोनवणे या तिघा युवकांनी खिशातील पैसे बळजबरीने काढून घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपींना विरोध केल्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला.
यावेळी आरोपींनी तलवारी, चॉपर घेऊन सुदर्शन वाणींचा पाठलाग करत असतानाचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सुदर्शन वाणी यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली आहे.
शिर्डी पोलीसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली असून त्यांच्या विरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९०/२०२४ नुसार भा. दं.वि. कलम ३२७, ३२३, ५०४, ३४ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.