अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-  डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या खाल्लेल्या एका युवतीचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सईद ताहेर बेग (वय ३३, रा. संजयनगर, काटवन खंडोबा, अहमदनगर) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध, अत्याचार आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सईदला अटकही केली आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी सईद बेग याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवले.

लग्नाची विचारणा केल्यावर उडवा-उडवीची उत्तरे दिली. तिचा गर्भपात करण्यासाठी डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या आणून तिला खाऊ घातल्या. त्यामुळे मुलीस पोटदुखी, उलटीचा त्रास सुरू झाला.

अतिरक्तस्त्रावाने तिची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे तिला उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

तिच्या मृत्यूबद्दल आरोपी सईद बेग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके करीत आहेत. सईदला अटक केली असून न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.