अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- साईबाबा संस्थान प्रशासनाच्यावतीने साई दर्शनासाठी दररोज फक्त पंधरा हजार भाविकांना दर्शनपास देण्याची सुविधा करण्यात आली आहे.

ऑनलाईन दर्शन पास बुकिंग करताना बँक खात्यातून पैसे तर गेले मात्र दर्शनाचा ऑनलाईन पास न मिळाल्याने त्रस्त झालेल्या भाविकांनी साईमंदिर परिसराचे प्रवेशव्दार क्रमांक चार समोर ठिय्या करत साईदर्शनाची मागणी केली. सोमवार सकाळपासून ऑनलाईन दर्शन प्रणालीचा लाभ घेणार्‍या शेकडो भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

आपल्या मोबाईल आणि खासगी ठिकाणी ऑनलाईन दर्शनपास काढताना सर्व पूर्तता झाली. मात्र शेवटी पास न मिळाल्याने भाविक हैराण झाले. अनेकदा पैसे जाऊनही पास न आल्याने अखेर भाविकांचा संताप अनावर झाला व त्यांनी गेट नंबर चार गाठले. अनेक भाविकांचे पैसे तर गेले मात्र पास न मिळाल्यानं भाविकांनी आम्हाला दर्शनासाठी सोडा अशी मागणी केली.

संतापात भाविकांनी संस्थान अधिकार्‍यांना बोलवा अशी मागणी केली. या मागणीवर अडून बसलेल्या भाविक व सुरक्षा रक्षक यांच्यात ढकलाढकली झाल्याची चर्चा आहे. गेटवरील सुरक्षा रक्षक काहीही ऐकून घेईना. तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांना बोलवत नसल्याचे पाहून अखेर एकत्रित जमून गेट समोरचं ठिय्या दिला.

साईनामाचा जयघोष करत येथील व्यवस्थेबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. भाविक बराच वेळ बसून होते. यावेळी साईमंदिरचे सुरक्षा अधिकारी यांनी भाविकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र भक्त ऐकत नव्हते अखेर शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी स्वतः मध्यस्थी करत

ज्या भाविकांचे पैसे कट झाले त्यांना गेट नंबर एक मधून सोडण्याचे जाहीर केले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तब्बल तीन तासांची भाविकांचा दर्शनासाठीचा ठिय्या अखेर संपुष्टात आला.