Discover

मनोज जरांगे पाटलांची महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी सभा ! १५० एकर जागा, २५ लाख लोकं, पार्किंगला १०० एकर..५० जेसीबी, ६० रुग्णवाहिका..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मराठा आरक्षणासाठी सध्या महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलने सुरु आहेत. मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज सकाळीच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मराठा आंदोलकांनी धडक मोर्चा काढला होता. पण पोलिसांनी वाटेतच आंदोलकांना ताब्यात घेतले. हे सगळं वातावरण तापायला कारणीभूत ठरले

जालनातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांचे उपोषण. आता सध्या ते महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. सरकारने दिलेल्या मुदतीत आरक्षणासंदर्भात काही कार्यवाही केली नाही तर अंतरवाली सराटी येथे १०० एकरात भव्य सभा घेणार असे मनोज जरांगे यांनी म्हटलं होत.

त्यानुसार १४ ऑक्टोबरला अंतरवाली सराटी येथे त्यांची सभा होणार आहे. महाराष्ट्रातून मराठा बांधव त्या ठिकाणी जमा होतील. सभेची जोरदार तयारी सुरू आहे.

१५० एकर परिसर, ५० जेसीबी
सुमारे ५० जेसीबी येथे आले आहेत. सभेसाठी सुमारे १०० एकर जागा निश्चित करण्यात आली होती. परंतु एवढी जागा अपुरी पडेल असे सध्याचे चित्र आहे. या दृष्टीने बीड जिल्ह्यातून ५० जेसीबी मागवून या आणखी काही भागात साफसफाई सुरु आहे.

मराठा समाज बांधव वर्गणी करत आहेत. या सभेला योगदान देत आहेत. सभेला २५ लाख लोकं जमतील असा अंदाज वर्तवण्यात येत असल्याने १०० एकर ऐवजी जास्त जागेची तयारी सुरु आहे. जेसीबी, ट्रॅक्टरद्वारे लेवलिंग सुरू असून जागा मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीनही काढण्याचे काम हाती घेतले आहे.

पार्किंगसाठी १०० एकर जागा
येथे येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या सोयीसाठी जवळपास १०० एकर मध्ये पार्किंग सोय करण्यात आले आहे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती ६० एकर, अंतरवाली सराटी येथे २० एकर, नालेवाडीमध्ये २० एकर अशी वाहनांची पार्किंग सोय करण्यात आली आहे.

६० रुग्णवाहिका सभास्थळी
सभास्थळी ६० रुग्णवाहिकाची सेवा देण्यात येणार आहे. महाशक्ती रुग्णवाहिका संघटनेकडून ही सेवा मिळणार आहे. काही इमर्जन्सी उद्भवली तर ३० कार्डियाक रुग्णवाहिका व इतर ३० रुग्णवाहिका सेवेसाठी असतील. ३० कार्डियाक रुग्णवाहिकेत एक डॉक्टर, नर्स, व्हेंटिलेटर, औषध उपलब्ध असतील.

खर्च कोण करतंय ?


अनेकांना प्रश्न पडला असेल की सभेचा खर्च कोण करतंय? तर यासाठी जालना जिल्ह्यातील १२३ गावांनी मिळून सभेचा खर्च उचलला आहे. इतर ठिकाणावरूनही ओघ सुरु आहे.

गाडी बंद पडल्यास मोफत दुरूस्ती
बीड सीमेवरून अंतरवाली सराटीकडे जाणारी कोणतीही गाडी बिघडल्यास किंवा बंद पडल्यास या गाडीची सेवा मोफत देण्यात येणार आहे. सभेसाठीच्या चारचाकी वाहनांची मोफत दुरुस्ती म्हणून बीड जिल्ह्यातील जालना नगरयेथील मेकॅनिक बांधवांनी हा निर्णय घेतला आहे. सभेसाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व मराठा समाजबांधवांना ही सेवा देण्यात येणार आहे.

पोलीस बंदोबस्त
स्थानिक आयोजक व पोलीस प्रशासनाकडून सभास्थळाचा आढावा घेतला जात आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असणार आहे. विशेष म्हणजे सभेच्या स्टेजची पाहणी करून मनोज जरांगे यांना कोणत्या बाजूने आणणार, काय खबरदारी घेतली जाणार याचाही आढावा पोलीस घेत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24