पाऊस लांबल्याने तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. पशुपालक शेतकरी अडचणीत आले आहेत. गतवर्षी साठवलेला सुका चारा संपत आला असून, आसपासच्या परिसरात चारा शोधण्यासाठी पशुपालक धडपडत असल्याचे दिसत आहे. मात्र चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
शेतकरी वर्ग शेताच्या मेहनती पूर्ण करून पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करू लागले आहेत. पावसाच्या जिवावर अवलंबून असणारे शेतकरी चिंतातुर आहेत. बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठला आहे. पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. शेतीच्या पाण्याची मोठी कमतरता भासू लागली आहे
नगर तालुक्यातील वाळकी, गुंडेगाव परिसरात महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याने खरीपातील पिकांसह ऊस, मका ही चारा धोक्यात सापडली आहेत. पावसाअभावी पाण्याचे उद्भवही कोरडेठाक पडल्याने पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. चारा व पाणी टंचाईने दुध उत्पादक शेतकरी बेजार झाला आहे.
दुधाची पंढरी समजले जाणारे वाळकी, गुंडेगाव, देऊळगाव सिद्धी, राळेगण म्हसोबा, वडगाव तांदळी आदी परिसरात पावसाने दांडी मारल्याने जनावरांच्या चाऱ्या बरोबरच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याचा परिणाम दूध व्यवसायावर होत आहे. शेतक- यांना जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्यासाठी अन्य घटकांवर किंवा विकतच्या चाऱ्यावर अवलंबून रहावे लागत आहे.
चाऱ्याचे भाव वाढल्याने दुध उत्पादकांची चिंता वाढली आहे. पाण्याची टंचाई अन् चाऱ्याची दरवाढीने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. उत्पादन खर्च व दूध दरातील तफावत पाहता दूध व्यवसायिकांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दुग्धव्यवसायातून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह भागवला जात आहे. सध्या पावसानेच दडी मारल्याने पाण्या सह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चाऱ्याचा तुटवडा जाणवत आहे.
सध्या दुभत्या जणावरांना ओला चारा म्हणून ऊस घातला जातो. मात्र, पाऊस नसल्याने ऊसाची मागणी जास्त आहे. जनावरांना दिल्या जाणाऱ्या आहारातील कडबा कुट्टी, भूसा, सरकी पेंड, गोळी पेंड, मका, वैरण, गव्हाचे कणी, हत्ती गवत, ऊस, कडबा आदींचे दर गगनाला भिडले आहेत.
अशा अनेक कारणांमुळे दूध व्यावसायिकांना अडचणीला सामोरे जावे लागत असल्यामुळे दूध व्यवसाय मोडकळीस येण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच उत्पादन खर्च व दूधाच्या किंमती यातील तफावत पाहता या वर्षी पावसाने ओढ दिल्याने दूध व्यवसायाला संकट येण्याचे चित्र दिसत आहे.