Discover

PM Narendra Modi At Ahmednagar : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अहमदनगर जिल्ह्यात येणार !

Published by
Tejas B Shelar

PM Narendra Modi At Ahmednagar:- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात विविध विकास कामांचे उदघाटन 26 ऑक्टोबर रोजी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. तसेच प्रत्येक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वय राखत त्यांना नेमून देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री यांच्या संभाव्य दौऱ्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी पालकमंत्री श्री विखे पाटील बोलत होते.

बैठकीस खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, मध्यवर्ती जिल्हा बँकचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार वैभव पिचड, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवाशंकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचबरोबरच या कार्यक्रमामध्ये विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटपही करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी कार्यक्रम स्थळी आणण्याची व परत सोडण्याची वाहतूक व्यवस्था करावी. कार्यक्रम स्थळी भोजन व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, पिण्याचे पाणी आदि सर्व सुविधांचे सुक्ष्म नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवावी. प्रधानमंत्री थांबणार आहेत त्या विश्रामगृह तसेच कार्यक्रमस्थळी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात यावा. सुरक्षा व्यवस्थेबाबत ब्लू बुक मधील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. प्रधानमंत्री ज्या मार्गाने प्रवास करणार आहेत त्या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करण्यात यावे.

आवश्यकतेनुसार रस्त्यांची दुरुस्ती करून घेण्यात यावी. मान्यवर भेट देण्यात येणाऱ्या ठिकाणी स्वच्छता राहील यादृष्टीने कार्यवाही करावी. संपूर्ण दौऱ्यादरम्यान वीज पुरवठा सुरळीत ठेवावा. रस्त्यावरील सर्व विद्युत तारांची तपासणी करण्यात यावी. आरोग्य पथक सर्व सुविधांसह सज्ज ठेवण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम इतर जिल्ह्यांच्या तुलनेते सर्वोत्कृष्ट असा कार्यक्रम शिर्डी येथे संपन्न झाला. त्याप्रमाणेच या कार्यक्रमाचेही सुक्ष्म नियोजन करण्यात येऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होत असलेल्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षपणे काम करावे. या काळामध्ये कुठल्याही अधिकारी, कर्मचाऱ्याने विनापरवानगी मुख्यालय न सोडण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाकडे जबाबदारी सोपविण्यात येणार असुन तसे आदेशही निर्गमित करण्यात येणार आहेत. आदेशाप्रमाणे प्रत्येक विभागाने त्यांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.बैठकीस पदाधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com